गडकरींनी केला आंध्रातील 16 प्रकल्पांचा शुभारंभ

October 17,2020

नागपूर, 17 ऑक्टोबर : केेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल आंध्र प्रदेशातील राष्ट्रीय महामार्गाच्या 16 प्रकल्पांचा कोनशिला अनावरण समारंभ पार पडला. तसेच महामार्गाचे काम पूर्ण झालेल्या 10 प्रकल्पाचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यात विजयवाडा कनकदुर्गा उड्डाणपुलाचाही समावेश आहे. 15,592 कोटी रुपयांच्या या महामार्गांच्या कामांमुळे आंध्र प्रदेशातील अर्थव्यवस्थाच बदलणार असल्याचे याप्रसंगी नितीन गडकरी म्हणाले. सन 2020-21 मध्ये महामार्गांच्या 28 प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

एकूण 1411 किमीच्या या महामार्गांमुळे आंध्र प्रदेशची औद्योगिकदृष्टट्या विकासाकडे वाटचाल होणार असून आभासी माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमाला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी, केेंद्रीय रस्ते वाहतूक राज्यमंत्री डॉ. व्ही. के. सिंग, केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी, रस्ते बांमधकाम मंत्री मलागुंडला शंकरनारायण प्रामुख्याने यावेळी उपस्थित होते. ज्या प्रकल्पांचे नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. त्या 10 प्रकल्पांची एकूण लांबी 529 किमी असून 8 हजार कोटींचे हे प्रकल्प आहेत. कनकदुर्गा उड्डाणपूलामुळे इंद्राकिलाद्री टेकडीचा परिसरातील भाग विजयवाडा शहराला जोडले जाणार आहेत. आंध्र प्रदेशात सन 2014 पासून 32 हजार 250 कोटींचे महामार्गाचे प्रकल्प मंजूर झाले असून 24 हजार कोटी या प्रकल्पांवर खर्च झाले आहेत. सन 2020-21 पर्यंत 8869 कोटींचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत.

आजच्या कोनशिला अनावरण समारंभामध्ये बंगलोर चेन्नई एक्सप्रेस महामार्गाचाही समावेश असून या महामार्गामुळे कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू ही तीन राज्ये जोडली जातील. 262 किमीचा हा महामार्ग असून चारपदरी आहे. 5175 कोटी रुपये या प्रकल्पाला खर्च येणार आहे.